“भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या गावागावातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या वतीने मी हा ‘उंच माझा झोका’ पुरस्कार स्वीकारत आहे”, या उद्गारांसहित डॉ. हर्षदा देवधर यांनी झी मराठीचा प्रतिष्ठित असा ‘उंच माझा झोका’ पुरस्कार स्वीकारला. दि. १९/०८/२०१६ रोजी डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये संपन्न झालेल्या ‘उंच माझा झोका’ पुरस्कार वितरण सोहोळयात ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ च्या डॉ. हर्षदा देवधर यांच्या सोबत अन्य सात कर्तृत्ववान महिला कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले.
‘हा पुरस्कार संस्थेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे’, असे उद्गार डॉ. हर्षदा देवधर यांनी पुरस्कार घेताना सांगितले.
आपल्या भाषणात डॉ. हर्षदा म्हणाल्या की अॅनिमिया हटाव योजनेद्वारे केलेल्या छोट्या-छोट्या प्रयोगांमधून महिलांचे आरोग्य उंचावले आहे. सिंधुदुर्गातील ज्या घरांमध्ये वीज पोहचली नाही, अशा कुटुंबांना सोलार दिव्यांची मदत करून त्यांच्या घरात प्रकाश पोहोचवला गेला.
कातकरी मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी कातकरी विकास योजना राबविण्यात येते. तसेच आत्तापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ५३०० बायोगॅस बांधून गावातील महिलांचे जीवन भगीरथ ने सुखकर केले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील स्वयंपाकघरातील महिला आनंदी झाली. या व अशा सर्व विषयांवर प्रकाश टाकणारे मनोगत डॉ. हर्षदा देवधर यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर झी मराठीच्या मंचावर व्यक्त केले.
सिंधू आणि साक्षीप्रमाणे कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या स्त्री-शक्तीचा सन्मान! उंच माझा झोका पुरस्कार २८ ऑग. संध्या ७ वा pic.twitter.com/IO8iOgS1l3
— Zee Marathi (@zeemarathi) August 22, 2016
सन २०१६ वर्षीचा ‘झी मराठी’चा “उंच माझा झोका” पुरस्कार हा समाजासाठी देत असलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल व सामाजिक कार्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सामाजिक संस्था भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, यासोबतच कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपंगांच्या पुनर्वसनासाठी गेली चार दशके परिश्रम घेणाऱ्या नसीमा हुरझूक, क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी नौकानयनपटू तारामती मतीवडे, कृषी विभागातील कामगिरीसाठी अहमदनगरच्या कविता जाधव-बिडवे, पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीसाठी गोंदियाच्या वनसंरक्षक उषा मडावी, सामाजिक कार्यातील कामगिरीसाठी मुंबईतील आशा व प्रेरणा संस्थेच्या प्रिती पाटकर, कायदा व सुव्यवस्था क्षेत्रातील कामगिरीसाठी भारतातील पहिल्या महिला कारागृह उपमहाअधीक्षक स्वाती साठे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी अन्न तंत्रज्ञ आणि जैवअभियंता डॉ. स्मिता लेले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ला मान. नाम. श्री. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘झी मराठी’चा “उंच माझा झोका” पुरस्कार प्रदान करण्यात आला. खेडी/गावे समृद्ध होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण हा शहरात कामानिमित्त न जाता सिंधुदुर्गातच राहिला पाहिजे म्हणून ही संस्था ज्या पद्धतीने काम करते आहे ही खरच कौतुकाची गोष्ट आहे. तसेच सिंधुदुर्गासारख्या जिल्ह्यामध्ये गवंडी तयार करण्याचे अशक्य कामही यशस्वीरीत्या मोठ्या प्रमाणात भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानने केले आहे. ‘नाबार्ड’ व ‘सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँक’यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील महिलेला बायोगॅस बरोबरच शेतीपूरक व्यवसायात मदत करण्याचे कामही या संस्थेने केले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी आपल्या मनोगतात काढले.
या पुरस्कार सोहळ्यादरम्यान संस्थेच्या कामाचा लेखाजोखा दाखवणारी ३ मिनिटांची चित्रफीत (AV) दाखविण्यात आली. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन सिने अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांनी केले.