कोकणातील गणपती शाळांची लगबग सुरु झाली. मातीला दैवत्व प्राप्त करून देणारे हे सारे गुणी कलावंत ही आपली शान आहे. गेली ३ वर्षे मूर्तिकार संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व भगीरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्तपणे या कलावंतांसाठी सुलभ कर्ज योजना चालू केली. गतवर्षी मूर्तिकारांना ३ कोटींचे कर्ज वितरण झाले आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्ति बनविण्यासाठी मूर्तिकारांचे प्रशिक्षण करण्यात आले. शेतातील माती, गोमय, कागदी लगदा यासारख्या विविध स्थानिक उपलब्ध गोष्टींपासून लगदा बनविण्याचे सूत्र प्रमाणित करण्यात आले. यासाठी मूर्तिकार संघटनेच्या श्री. बापू सावंत, श्री. विलास मळगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
आज वजराठ गावातील श्री. गजानन (बबन) अनंत नाईक भगीरथमध्ये आले होते. सहावीमध्ये असताना वडिलांचे निधन झाले पण, गणेश शाळा बंद पडू द्यायची नाही असा श्री. बबन नाईक यांचा निर्धार होता. सुरुवातीला त्यांनी २ गणेशमूर्ति बनवण्यापासून सुरुवात केली. आता ४० वर्षांनंतर ते ३५० गणेशमूर्ती बनवितात. त्यांची आता १२०० चौरसफुटाची शेड आहे. शेती सांभाळून ते गणपती शाळा चालवतात. ३ महिने १५ माणसांना त्यांच्यामुळे रोजगार मिळतो. उत्तम रेखणीकाम हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. बबन यांची शाळा जरी सहावी मध्ये सुटली तरी ३५० गणपतींच्या शाळेचे हे मास्तर आहेत.