भगीरथ शेततळे योजना –
पाण्याच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी एक पाऊल
ह्यावर्षी झालेल्या अगदी कमी पाऊसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई आणि त्याचे शेतीवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन *भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने काही गावांमध्ये ‘भगीरथ शेततळे योजना’ राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या विहिरीच्या वरच्या भागातील योग्य जागेवर शेततळे तयार करून पावसाचे पाणी साठवावे, हा मुख्य उद्देश आहे.
शेत तळ्याचे बांधकाम कसे करतात?
अंदाजे *४० × ४० × १० फूट आकाराच्या शेततळ्यासाठी JCB मार्फत खोदकाम* करण्यात येते. यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवता येऊन ते हळूहळू जमिनीत मुरण्यास मदत होते. परिणामी *भूजल पातळी वाढण्यास आणि विहिरींमध्ये पाणी टिकून राहण्यास* हातभार लागतो.
या उपक्रमाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे *शेतकऱ्यांचा सहभाग आणि श्रमदान*. शेततळ्याच्या बांधावर बांबू, नेपियरसारखी गवताची लागवड किंवा इतर नैसर्गिक उपाय करून बांध अधिक मजबूत करण्यावरही भर दिला जाईल .
*‘पाणी अडवा, पाणी जिरवा आणि शेतीला शाश्वत पाण्याचा आधार द्या’* या विचारातून राबविण्यात येणारी ही योजना केवळ शेततळे निर्माण करण्यापुरती मर्यादित नसून, गावातील पाणी व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी एक सामूहिक प्रयत्न आहे.