केवळ काय करू नका हे सांगण्यापेक्षा, काय करायला हवं याचा पर्याय देणं महत्त्वाचं!

    
|
केवळ काय करू नका हे सांगण्यापेक्षा, काय करायला हवं याचा पर्याय देणं महत्त्वाचं!


पालघरच्या प्रगती प्रतिष्ठान या संस्थेचे २० प्रशिक्षणार्थी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानमध्ये कुक्कुटपालन आणि बायोगॅस प्रशिक्षणासाठी आले होते. १६ ते १८ ऑक्टोबर २०२६ या तीन दिवसांत हुम्रास गावात गणपत सावन यांनी त्यांना प्रत्यक्ष बायोगॅस बांधण्याचे प्रशिक्षण दिले. 

जंगलतोड थांबवावी, चुलींचा वापर कमी करावा आणि मिथेनसारख्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करावे, हे महत्त्वाचे आहेच. पण त्यासाठी लोकांना व्यवहार्य पर्याय उपलब्ध करून देणंही तितकंच गरजेचं आहे. भगीरथचा आग्रह नेहमीच राहिला आहे — ‘हे करू नका’ असं सांगण्यापेक्षा ‘याऐवजी हे करा’ हा पर्याय उभा करा!


पशुधन असलेल्या कुटुंबांसाठी बायोगॅस हा स्वयंपाकाच्या इंधनाचा स्थानिक आणि शाश्वत पर्याय ठरू शकतो. म्हणूनच भगीरथ बायोगॅस उभारणीसाठी तांत्रिक प्रशिक्षण देत आहे. या प्रशिक्षणातील सर्व २० प्रशिक्षणार्थींकडे गाई-गुरे आहेत. त्यामुळे येत्या वर्षभरात या २० कुटुंबांच्या घरांमध्ये बायोगॅस पोहोचून ती धूरमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करतील, ही आशा आहे. शाश्वत बदल केवळ जागृतीतून नाही, तर योग्य पर्याय आणि प्रत्यक्ष कृतीतून घडतो! 🌿