रोजगाराच्या नव्या वाटा... मार्गदर्शन

    

रोजगाराच्या नव्या वाटा... मार्गदर्शन 

दि. २७ नोव्हेंबर २०१८ रोजी, गाव कोलगाव (तालुका सावंतवाडी) येथे शासनाच्या ‘चांदा ते बांदा’ योजनेतंर्गत शेती व शेतीपूरक प्रकल्पांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नाबार्ड, सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बँक व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या UPNRM – 2 (नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन) प्रकल्पाविषयीही माहिती देण्यात आली. कार्यशाळेस बचत गटांमधील ११३ महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

विविध संसाधनाचा नियोजनबद्ध वापर करण्यासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व गावाच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणे असा या कार्यशाळेचा उद्देश होता. बायोगॅस, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, हळद-सुरण लागवड इ. विषयांचे मार्गदर्शन ‘चांदा ते बांदा’ योजनेच्या समितीचे सदस्य मा. श्री. नितीन वाळके, ‘भगीरथ’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी यावेळी केले.

कार्यशाळेमध्ये महिलांना UPNRM प्रकल्पाची चित्रफित (Documentary) दाखविण्यात आली. शासनाच्या अनुदान योजना, शेतीपूरक व्यवसायांसाठी बँकेकडून मिळणारा कर्जपुरवठा याविषयी सर्व माहिती महिलांनी घेतली व शेतीपूरक व्यवसाय करून रोजगाराचा नवा मार्ग मिळवण्याचा आशावाद यावेळी महिलांनी व्यक्त केला. कार्यशाळेत श्री. मनोहर ठिकार, श्री. संजय कारीवडेकर यांनी आपले कुक्कुटपालन व्यवसायातील अनुभव सांगितले.