‘भगीरथ’ची ‘लगान टीम’

30 Dec 2020 16:00:12
              
Bhagirath - 1_1 &nbs             रविवार, दिनांक २७ डिसेंबर २०२० रोजी, सायंकाळी ६ ते ९ या वेळेमध्ये ‘भगीरथ’चे प्रमुख विश्वस्त व सल्लागार यांची चिंतन बैठक झाली. ‘भगीरथ’च्या कामाला प्रारंभ होऊन २० वर्षे झाली. संस्थेची नोंदणी ही २००४ मध्ये जरी झालेली असली, तरी त्या आधीची ४ वर्षे छोटे मोठे काम हे कोणत्याही बॅनर व नोंदणीशिवाय सुरु होते. पुढील २५ वर्षांमध्ये होणाऱ्या कामाची दिशा ठरविण्यासाठीची ही चिंतन बैठक होती. सामाजिक काम हे १०० मीटर धावणे नाही व एकट्याने धावण्याची मॅरेथॉन तर नाहीच नाही, ही एक प्रकारची रीले आहे. ज्यामध्ये एका समूहाने केलेले काम हे अलगदपणे पुढच्या पिढीकडे शब्दार्थ व भावार्थ न बदलता संक्रमित करणे गरजेचे असते. आजच्या घडीला ‘भगीरथ’ने केलेले अनेक प्रयोग सरकारी यंत्रणा, राजकिय इच्छाशक्ती व लोकसहभाग यांमुळे विस्तारीत होत आहेत. जेणेकरून अधिकाधिक वंचित समाजाला त्याचा लाभ होईल. सामाजिक संस्था ही सामाजिक परिवर्तनाची छोटी प्रयोगशाळा असते. एखादा प्रयोग करून पहावा, तो प्रयोग जर विज्ञानाच्या कसोटीवर व समाजमान्यतेवर उत्तीर्ण झाला, तर तो प्रयोग अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवताना अडचणी येत नाहीत. अंड्यांचे गाव, परसबागेतील कुक्कुटपालन, बायोगॅस, एकत्रित शेती, प्रेशर कुकर योजना, ईकोफ्रेंडली गणेश यांसारखे विविध प्रयोग ‘भगीरथ’च्या लोगोमधील वटवृक्षाप्रमाणेच बहरत आहेत. पुढील २५ वर्षांमध्ये सोबतच्या ‘लगान टीम’ बरोबर अधिक नाविन्यपूर्ण, समाजाभिमुख प्रयोग ‘भगीरथ’ करेल या संकल्पाचा हा दिवस होता.
Powered By Sangraha 9.0