सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शौचालय संख्या एकने वाढली !

    
|


Bhagirath - 1_1 &nbs         श्री. बाबी पदू वरक (गाव हुमरस, धनगरवाडी) यांनी आज शौचालय बांधण्याचे ठरविले. यासाठी लागणारे सिमेंट हे ‘भगीरथ’ने त्यांना मदत म्हणून दिले. एवढ्या दोन वाक्यातच विषय संपत नाही, म्हणून थोडे सविस्तर लिहीत आहोत.

सिंधुदुर्ग जिल्हा हा साक्षरतेमध्ये व निर्मल जिल्हा म्हणून घोषित होवून काही वर्षे लोटली आहेत, पण बाबी वरक यांच्यासारखे काहीजण अजूनही हा बदल न स्वीकारलेल्या गटामध्ये येतात. मांजराचे पिल्लूपण स्वतःचा नैसर्गिक विधी करण्यासाठी छोटासा खड्डा मारते व स्वच्छतेचा एक मूक संदेश समाजाला देत असते. कोकणातील कणकवली ही ‘गोपुरी’ची जन्मभूमी होय. कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी भंगीमुक्ती व्हावी म्हणून झिरपणीचे शौचालय पहिल्यांदा बांधले. ही कृती खूप महत्त्वाची होती. आचार्य विनोबा भावे आप्पासाहेबांच्याबाबतीत असं म्हणायचे की, ‘एक आप्पा बाकी सारे गप्पा’. उघड्यावर शौचाला जाण्यामुळे पसरणारी रोगराई व त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम हा साऱ्या विकसनशील देशांना पडलेला गहन प्रश्न आहे. याला साधे सोपे उत्तर म्हणजे शौचालयाचे बांधकाम व त्याचा वापर करणे होय. पण त्याची गरज व महत्त्व पटवून देण्यासाठी संत गाडगेबाबा अभियानाची भूमिका खूपच महत्त्वाची होती. विषाणू, जीवाणू व त्यापासून पसरणारे आजार यांच्या पांडित्यपूर्ण माहितीपेक्षा भंगी लोकांनाही प्रतिष्ठेचे जगणे जगता आले पाहिजे, म्हणून सोप्या शौचालयाचे तंत्रज्ञान आप्पासाहेबांसारखा द्रष्टा मनुष्यच शोधू शकतो. सरकारने शौचालय बांधकामासाठी भरघोस अनुदान देवूनसुद्धा कातकरी, लमाणी तांडे, चिऱ्याच्या खाणी व दगड फोडणारे कामगार अजूनही या साऱ्या मूलभूत गोष्टींपासून वंचित आहेत. या लोकांना त्यांच्या परिभाषेमध्ये समजून सांगणे हे खूपच कठीण काम असले तरी अशक्य नाही. समाजशास्त्रामध्ये परीवर्तन होईपर्यंत पाठपुरावा करत राहणे गरजेचे असते. बाबी वरक यांच्याबाबतीमध्ये या पाठपुराव्याला आज यश आले. एखादी साधी सोपी वाटणारी गोष्टपण किती महत्त्वाची आहे हे समजणे व समजून नंतर उमजणे महत्त्वाचे असते. संवाद हा कधी केवळ शब्दाचा नसतो. शब्द हे साधन असते. तुम्ही जर सामान्य माणसाला त्याच्या हिताच्या गोष्टी खूप मनापासून सांगितल्या, तर त्याला त्या कधीतरी पटतात एवढं मात्र १०० टक्के. परीवर्तनाची पेरणी करत असताना, रुजेल की नाही याचा विचार न करता ‘पेरते व्हा’ हा संदेश आजच्या दिवसात आम्हांला मिळाला.