‘आत्मनिर्भरता’ अंडी उबवणूक केंद्रातून आलेली

01 May 2021 17:02:49

Bhagirath - 1_1 &nbs      स्थानिक गरजा ओळखल्या की, शाश्वत रोजगार निर्मिती होते. प्राथमिक अवस्थेमध्ये या पायवाटा खूप छोट्या असतात. अनेकांच्या सहभागातून हमरस्ता बनतो. असाच एक वेगळा प्रयोग आपल्या साऱ्यांच्या माहितीसाठी देत आहोत.

वेताळ बांबर्डे, ता. कुडाळ येथील ‘मैत्री कोकण अॅग्रो’चे मालक श्री. हर्षद धामापूरकर यांच्या अंडी उबवणूक केंद्राच्या यशाचा दर हा ८०% आहे. स्वतःच्या परसबागेतील सफल अंडी व गावातील सफल अंडी ते जमा करतात. अंडी उबवणूक केंद्रामुळे स्वयंपूर्णता येणार आहे. अंड्याची उत्पादन किंमत ३/- ते ४/- रुपये एवढी असते. रिटेलने अंडे विकल्यास १०/- रुपये मिळतात, तर होलसेलचा दर ७/- रुपये मिळतो. ‘अंडी उबवणूक केंद्र’ हे मूल्यवृद्धीसाठी अत्यंत गरजेचे ठरते. २१ दिवसांमध्ये अंडी उबवणूक केंद्रातून पिल्लू तयार झाल्यावर त्याचा दर २०/- ते २५/- रुपये एवढा असतो. या व्यवसायाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण घेतल्यास अंडी उबवण्याची टक्केवारी ही ८५% च्या जवळपास जाते, ही वाढती टक्केवारी हे यशाचे गमक असते.
Bhagirath - 2_1 &nbs

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारचे विज्ञान व तंत्रस्नेही उद्योग अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत. पोस्टामध्ये पैसे दुप्पट होण्यासाठी काही वर्षे जावी लागतात. पण कुक्कुटपालन व्यवसायामध्ये ही सारी किमया एका महिन्यामध्ये होते. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे भविष्यामध्ये गावठी कोंबडी व अंडी यांचे उत्पादन व विक्री व्यवस्था हे रोजगाराचे मोठे साधन ठरेल. लोकांना गावठी कोंबडी हवी असते, पण ते ब्रॉयलर निरुपायाने घेतात. गावठी पिल्ले अधिक प्रमाणात व योग्यवेळी मिळण्यासाठी हॅचरीची गरज असते. पुणे येथील सेवा इंटरनॅशनल संस्था व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांनी एकूण ४ अंडी उबवणूक केंद्रे उभी करण्यासाठी युवा शेतकऱ्यांना मदत केली आहे. कोलगाव येथील श्री. मनोहर (पप्पू) ठिकार (९४०३५६२२५६), वेताळ बांबर्डे येथील श्री. हर्षद धामापूरकर (९५७९८७६३५२), मालवण, कट्टा येथील श्री. गणेश चव्हाण (९४०४४९६०९३) व सर्वप्रथम अंडी उबवणूक केंद्र सुरु करणारे गोठोस येथील श्री. रत्नकांत चव्हाण (९४०३३६६४४७) यांचा एक समूह या सर्वांना तांत्रिक मदत व मार्गदर्शन करीत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता महिला बचत गट व गावातील तंत्रस्नेही युवक-युवती यांनी पुढाकार घेतल्यास १० गावांच्या समूहामध्ये अशा प्रकारचे अंडी उबवणूक केंद्र सुरु होवू शकते. १००० अंडी उबवणूकीची क्षमता असलेल्या केंद्रासाठी ८०,०००/- रुपयांचे मशीन लागते. गावातील महिलांनी सुधारीत जातीची प्रत्येकी १० कोंबडी व एक नर यांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केल्यास अंडी उबवणूक केंद्राच्या गरजेएवढी अंडी गावात तयार होवू शकतात. समूह व परस्पर सहकार्यातून विकास हा पुढील ५ वर्षांसाठीचा मूलमंत्र आहे.
Bhagirath - 3_1 &nbs

Powered By Sangraha 9.0