रामेश्वर दूध संस्था, घावनले – नवे रूप समाजहिताच्या सहभागातून

    
|

रामेश्वर दूध संस्था, घावनले – नवे रूप समाजहिताच्या सहभागातून

कुडाळ तालुक्यातील घावनले हे गाव शेतकरीप्रधान असून, शेती आणि पशुपालन हा गावकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. या गावातील रामेश्वर दूध संस्था अनेक वर्ष गावकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेली आहे. दूध संकलन केंद्र हे केवळ दूध गोळा करण्याचे ठिकाण नसून, ते गावच्या अर्थव्यवस्थेचे केंद्रबिंदू असते.

परंतु, संस्थेची इमारत दीर्घकाळ दुरुस्तीअभावी जीर्ण झाली होती. पावसाळ्यात गळणारे छप्पर, भिंतीवरील उखडलेला रंग आणि जुनी उपकरणे यामुळे संस्थेचे स्वरूप खालावत चालले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पंधरा दिवसांपूर्वी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली.


gHAVNALE1 

या बैठकीत संस्थेच्या नव्या रूपासाठी काही ठोस निर्णय घेण्यात आले :

1) नवीन छप्पर बांधणी व रंगकाम
2) संगणक, प्रिंटर व आधुनिक तांत्रिक सोयी
3) कपाटे, टेबलं व फर्निचर
4) वजन काटा आणि इतर मूलभूत सुविधा

या सर्व कामांसाठी अंदाजे ₹2,50,000 इतका खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी दूध संस्थेने ₹40,000 निधी देण्याचे ठरवले असून, उर्वरित खर्च भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान आणि प्राज संस्था यांच्या CSR निधीतून केला जाणार आहे.

कामाची सुरुवात
गावकऱ्यांनी श्रमदानाचा मार्ग स्वीकारला. सामूहिक चिंतन आणि लोकसहभागातून छप्पर दुरुस्तीचे काम कालपासून सुरू झाले असून, दोन दिवसांत ते पूर्ण होईल.


gHAVNALE3 

भगीरथची भूमिका
भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान नेहमीच सकारात्मक विचार आणि कृती यावर भर देते. आपल्यासाठी दूध केंद्र हे फक्त दूध संकलनाचे ठिकाण नसून, ते ग्रामीण अर्थव्यवस्थेचे “अर्थकेंद्र” आहे. ते आकर्षक, स्वच्छ आणि सर्व सोयींनी सुसज्ज असावे, हीच आमची इच्छा आहे.

लोकसहभागातून खरी दहीहंडी
काल दहीहंडी उत्सवाचा उत्साह संपूर्ण परिसरात अनुभवायला मिळाला. पण, भगीरथसाठी खरी दहीहंडी म्हणजे समाजहिताचे काम लोकसहभागातून उभारणे होय. या दृष्टिकोनातून रामेश्वर दूध संस्थेच्या इमारतीचे नवे रूप साकार होत आहे.

जय गोपालक – जय गोपाल 🙏